घर खरेदी करणे म्हणजे बहुतेक भारतीयांचे स्वप्न सत्यात उतरल्या सारखे असते. यापैकी अनेक जण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन किंवा गृहकर्ज घेतात. तर काही कर्ज न घेता घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात. पण जे घर घेण्यासाठी होम लोन घेतात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अर्ज करण्यापूर्वी या प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती असल्यास तुमचे होम लोन सहज मंजूर होऊ शकते. अशा परिस्थितीत, होम लोन घेताना येणाऱ्या काही अडचणींबद्दल जाणून घेऊया.
कर्जाचा अर्ज नामंजूर होणे
तुमचा घर खरेदीचा व्यवहार अंतिम टप्प्यात असतो आणि तुम्हाला बँकेकडून माहिती मिळते की तुमचा कर्जाचा अर्ज नाकारला गेला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही केलेले डाऊनपेमेंट अडकू शकते, तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे जेव्हाही तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करता. त्यावेळी सर्वप्रथम कर्जाची मर्यादा आणि बँकेकडून मिळालेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करा. यामुळे तुमची कर्ज प्रक्रिया सुलभ होईल आणि कोणताही व्यवहार थांबणार नाही किंवा त्यात अडथळे येणार नाहीत.
लोन प्रोसेस शुल्क
अनेक वेळा लोकांना असे वाटते की, त्यांना कर्जाच्या रकमेवरच व्याज द्यावे लागणार आहे. पण प्रत्यक्षात असे नसते, जेव्हा तुम्ही कर्ज घेता, तेव्हा तुम्हाला कर्ज प्रक्रिया शुल्क, डॉक्यूमेंटेशन फी, MOD शुल्क, मालमत्ता मूल्यांकन शुल्क, उशीरा दिलेल्या EMI वर दंड देखील भरावा लागतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही कर्जासाठी अर्ज कराल. त्यावेळी तुम्हाला या सर्व शुल्कांची माहिती असणे आवश्यक आहे.
होम लोनसह विमा संरक्षण
जेव्हा तुम्ही गृहकर्ज घेता तेव्हा कोणतीही बँक तुम्हाला सोबत विमा घेण्याची सक्ती करू शकत नाही. अनेक वेळा कमी प्रीमियमचे अमिष दाखवून ग्राहकांना विमा पॉलिसी ऑफर केली जाते. त्याच वेळी, काही बँका विमा पॉलिसीशिवाय गृहकर्ज मंजूर होणार नसल्याचे सांगतात. अशावेळी, तुम्ही बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकता.
मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क
राज्य सरकार प्रत्येक मालमत्तेच्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क आकारते. हे शुल्क इतर घटकांसह मालमत्तेचे स्थान, किंमत आणि आकारानुसार बदलते.
मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क मिळून मालमत्तेच्या मूल्याच्या सुमारे 3% ते 6% इतके असते. जर मालमत्ता ब्रोकरद्वारे विकत घेतली जात असेल, तर खरेदीदाराला ब्रोकरेज आणि कायदेशीर शुल्क भरावे लागते जे मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या 1% ते 2% असू शकते. अशा प्रकारे, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क 6% आणि दलाली 1% (एकूण 7%) गृहीत धरल्यास, 30 लाख रुपयांच्या मालमत्तेसाठी 2.1 लाख रुपये आणि 1 कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी रुपये 7 लाख असू शकतात (टक्केवारी उदाहरण म्हणून देण्यात आली आहे. अशाप्रकारेच शुल्क आकारत असतील असा आम्ही दावा करत नाही.).
घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.